शिंदे गटाचे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या आधीच करणार शक्तीप्रदर्शन

 

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने शिंदे गटाने आता युद्ध पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या एक दिवस आधीच शिंदे गटाने दादरमध्ये मेळाव्याचं आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या एक दिवस आधीच शिंदे गटाने दादरमध्ये मेळाव्याचे आयोजन केले.

या मेळाव्यातून शिंदे गट आपली ताकद दाखवणार असून मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र आता शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. हे पाहता यंदा होणारी महानगरपालिका निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन येत्या 17 नोव्हेंबरला आहे. त्यापूर्वीच म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी शिंदे गटाने मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. दादरच्या वीर सावरकर स्मारकात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची शिंदे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाच्या या मेळाव्यात सर्व नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात मोठ्या संख्येने गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटातील नेत्यांनी तयारी सुरु केली आहे.

Team Global News Marathi: