‘सावकारी वसुली करून पालिकेचे उत्पन्न वाढविणे कोणत्या तत्त्वात बसते; बारणे यांचं आयुक्तांना पत्र

 

पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ता कर थकलेल्या नागरिकांच्या घरातील कार, फ्रिज, टीव्ही उचलून महापालिकेने सावकारी वसुली करू नये. एवढे वर्षे झोपी गेलेले प्रशासन अचानक जागे झाले आणि लोकांच्या घरातील फ्रिज, टीव्ही उचलण्याची भाषा करू लागले, हे अतिशय खेदजनक, अवमानकारक आहे. नागरिकांना नाहक त्रास देऊ नका. हा आडमुठेपणाचा निर्णय तत्काळ मागे घेण्याची सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली.

खासदार बारणे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र दिले आहे. निवेदनात खासदार बारणे म्हणाले, ”ज्या निवासी मालमत्तांमध्ये नागरिक वास्तव्य करतात, अशा थकबाकीदारांकडे पाच किंवा दहा वर्षांपासून थकबाकी आहे. अशा निवासी मालमत्तांची जंगम मालमत्ता म्हणजे कार, टीव्ही आदी महत्त्वाची वस्तू जप्त करण्याची धडक कारवाई महापालिकेमार्फत याच आठवड्यात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. शास्ती कर आणि कोरोना महामारीच्या कालावधीतील थकबाकी जास्त आहे.

खासदार बारणे म्हणाले, ”सावकारी वसुली करून पालिकेचे उत्पन्न वाढविणे कोणत्या तत्त्वात बसते. सामोपचाराने करवसुली झाली पाहिजे. या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी. त्याची अंमलबजावणी करू नये. राज्य सरकार शास्ती कराबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी कर वसुलीसाठी कोणत्याही प्रकारची अतिघाई करू नये. नागरिकांना नाहक त्रास देऊ नये. घरातील फ्रिज, टीव्ही उचलण्याची भाषा करू लागले. हे अतिशय संतापजनक आहे. हा निर्णय तत्काळ थांबवावा. नागरिकांना नाहक त्रास देऊ नका.’

Team Global News Marathi: