शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाने ठाकरेंचं वाढलं टेन्शन, पुढचा मार्ग काय ?

 

शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग रचनेबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने महाविकास आघाडीचं निश्चितच टेन्शव वाढलं आहे. विशेषत: शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रभाग रचनेबाबत निर्णय घेताच शिवसेना सतर्क झाली आहे.

राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये मोठमोठ्या शहरांच्या होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या नव्या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसतील. अनेक भागांमधील राजकीय गणितं बदलतील. या नव्या बदलामुळे शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जास्त फटका बसू शकतो. याशिवाय मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. कारण शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यामुळे मुंबईतील सत्ता टिकवणं हे शिवसेनेपुढील मोठं आव्हान असणार आहे.

त्यामुळेच शिवसेना सतर्क झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या निर्णयावरुन शिवसेनेची तातडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: ही बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे.

रात्री साडेआठ वाजेपासून या बैठकीला सुरुवात झालीय. राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कायदेशीर बाजू या बैठकीत अभ्यासली जाणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकासआघाडी सरकारने घेतलेला निर्णय रद्द करत पुन्हा एकदा 2017 प्रमाणेच 227 वॉर्डांची रचना ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने मुंबई तसंच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येतही सुधारणा केली आहे.

Team Global News Marathi: