शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

 

यंदा पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटानंतर जल्लोषात दहीहंडीचा उत्साह राज्यभर साजरा होताना दिसत आहे. पण दहीहंडी म्हटलं की ठाणे हे समीकरण गेल्या अनेकवर्षांपासूनचं आहे. ठाण्यात दहीहंडी पथकांवर लाखो रुपयांचा वर्षाव होत असतो. यात राज्यभरातून विविध पथकं ठाण्यात थरांवर थर रचण्यासाठी येतात. यंदा राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचंही प्रतिबिंब दहीहंडी उत्सवात पाहायला मिळत आहे.

ठाण्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्याच्या मानाच्या हंडीच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण या बॅनरमधून उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला आहे.

टेंभी नाका दहीहंडीच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा दाखल देत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही”, हे बाळासाहेबांचा विधान आणि त्यासाठी त्यांची स्वाक्षरी असे बॅनर लावण्यात आले आहेत. तसंच बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे.

Team Global News Marathi: