राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्द्यावरून तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच आता शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शिंदे गट विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना असा वाद सुरू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या वकील पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी शिंदे गटाच्या ५ जणांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .
सदर तक्रारीवरून शिंदे गटातील पाचही पदाधिकाऱ्यांविरोधात वेगवेगळ्या कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील गाडे बंधूंनी तब्बल 300 शेतकऱ्यांची फसवणूक करत पोबारा केला होता. याच प्रकरणावरून गाडे बंधूंची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या शर्वरी तुपकर यांना शिंदे गटांकडून टार्गेट केलं गेलं होतं. त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली येथे पत्रकार परिषद घेतली होती.सोशल मीडियावर त्यांच्या बाबत अपशब्द वापरले असल्याचा आरोप वकील शर्वरी तुपकर यांनी केला.
रविकांत तुपकर यांच्या पत्नी असलेल्या एडवोकेट शर्वरी तुपकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या. तक्रार दाखल केल्यानंतर शिंदे गटातील गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ महाले, नारायण गरड, आणि विलास घोलप यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 294 501 509 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गट विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे.