राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुचक प्रतिक्रिया दिली. मात्र प्रतिक्रिया देण्यसापूर्वी संजय राऊत यांनी ट्विट करुन आधीच आपली भूमिका मांडली होती. पण त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांनी विशिष्ट परिस्थितीत हा निर्णय घेतला आहे. पण मला मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी केवळ पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकीय सन्यास घेतलेला नाही. ते शरद पवार आहेत. एक स्तंभ आणि शिखर आहेत. शरद पवार यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.
शरद पवारांसारखे नेते राजकारण आणि समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यावर शिवसेनेने बोलणे योग्य होणार नाही. पण ते शरद पवार असल्याने एवढेच म्हणेल की, ते शरद पवार असल्याने त्यांच्या नेतृत्वाची देशाला आणि राज्याला गरज आहे. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडी अचानक घडल्या असल्या तरी त्यात अनपेक्षित असे काहीही नाही हे अलिकडच्या घडामोडींकडे बघून वाटते, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांनी घेतलेला निर्णय तो कोणत्या परिस्थितीत आणि का घेतला याची माहिती तेच देऊ शकतात. पण त्यांच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनीही राजीनामा दिला होता. पण लोकमतामुळे त्यांना पुन्हा शिवेसनाप्रमुखांचा राजीनामा मागे घ्यावा लागला. असे नेते निर्णय अनेकदा एका विशिष्ट परिस्थित घेतात. शरद पवार यांनी तशा परिस्थित तो घेतला असेल, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.
आज त्यांच्याच पक्षाच्या बैठका सुरू आहेत. त्यांचाच पक्ष गोंधळलेला आहे. त्यांच्याच पक्षाच्या आधारस्तंभाने राजीनामा दिला आहे. अशावेळी इतर पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेणे आतातरी योग्य ठरणार नाही. या घडामोडींचा मविआवर काही परिणाम होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद नेतृत्व शरद पवारच करतात. शिवसेना पक्ष जसा ठाकरे या नावावरच चाललेला, जिथे ठाकरे तिथे शिवसेना. त्याचपद्धतीने जिथे शरद पवार तिथे त्यांचा पक्ष असेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींवर काहीच भाष्य करणार नाही. फक्त त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करु शकतो. मी नक्कीच याबद्दल नंतर शरद पवारांची भेट घेऊन चर्चा करु शकतो.