शरद पवार-राज ठाकरेंच्या आवाहनावर दरेकर म्हणाले की,

 

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अचानक अंधेरीची पोटनिवडणुक भाजपने लढवू नये, असे विनंतीवजा पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले.

राज ठाकरे, शरद पवार यांच्या मागणीनंतर भाजप नेत्यांनी आपले मत व्यक्त केले आहेत. यामध्ये भाजपचे नेेते आमदार प्रवीण दरेकर यांनी तर ‘आमचे ठरले’ असे म्हणत अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक भाजप लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आज पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ केला गेला. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या पत्रावर प्रतिक्रिया दिली.

दरेकर म्हणाले की, आता सहानुभूतीवर निवडणुका लढवण्याचे पर्व संपले आहेत. आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर जनता आपल्या मनातील माणसाला विजयी करतात. शिवसेनेतून ४० आमदार बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. मात्र उध्दव ठाकरे यांना सहानभूती मिळाली का, असा प्रश्न करत उलट बाळासाहेबांच्या शिवसेना आमदारांचे त्यांच्या मतदारसंघात जंगी स्वागत होते. लोक मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहेत, असे म्हणत दरेकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली.

राज ठाकरेंच्या पत्राविषयी विचारले असता दरेकर म्हणाले, लोकशाहीत पत्र लिहिण्याचा, मत मांडण्याचा व व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र आमचा उमेदवार विजयी करणे हा आमचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही आमचा उमेदवार निवडणुकीत उतरवला आहे. तेथील मतदार मुरजी पटेल यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा आम्हाला विश्वास आहे.

Team Global News Marathi: