शपथविधीनंतर सत्कार समारंभ वगैरे महिनाभर चालवण्यापेक्षा….. जयंत पाटलांनी लगावला टोला

 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जूनमध्ये कोसळले जेव्हा शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाविरुद्ध बंड केले होते.

दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तब्बल 39 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला. जवळपास महिनाभर राज्यात एकही मंत्री नव्हता, असे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाले नाही.

मात्र उशीरा का होईना शपथविधी होत आहे. आता शपथविधीनंतर सत्कार समारंभ वगैरे महिनाभर चालवण्यापेक्षा महाराष्ट्रात संकटात असलेला आमचा शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने धाव घेणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच शिंदे यांच्यासोबत जे 40-50 आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे होते. जे आधीच मंत्री होते, त्यांना चांगले खाते पाहीजे होते. प्रगती प्रत्येकाला अपेक्षित असते. त्यामुळे हिंदुत्व वगैरे हा मुद्दा नव्हता. आता ज्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले आहे, त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला, असंच म्हणावं लागेल, अशी कोपरखळीही जयंत पाटील यांनी मारली.

Team Global News Marathi: