शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ; क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचीही सुरक्षा

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचेनेते चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांबरोबर क्राईम ब्रांचचे पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात येत आहेत. राज्य पोलिसांच्या या सुरक्षेबरोबरच चंद्रकांत पाटील यांना सीआयएसएफ या केंद्रीय सुरक्षा दलाचीही सुरक्षा आहे. त्यामध्येसुद्धा वाढ करण्याचा विचार सुरू आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी (१० डिसेंबर) सायंकाळी पिंपरी चिंचवड इथे शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील हे चिंचवड गाव इथे मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि याच पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला.

तसेच या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना या घटनेवेळी तैनात असणारे ११ पोलिस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ८ पोलिस कर्मचारी आहेत. तर ३ पोलिस अधिकारी आहेत. चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. चोख बंदोबस्त असतानाही पाटील यांच्यावर हा प्रकार घडला कसा? यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

Team Global News Marathi: