शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात जाण्यास तयार- संजय राऊत

मुंबई : काल कर्नाटकमधील बेळगावात महाराष्ट्राच्या बसेसवर कानडी लोकांनी तुफान दगडफेक केली होती. या तोडफोडीच्या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे. ता महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना कर्नाटक सरकार आणि शिंदे सरकारला खडे बोल सुनावले. तसेच आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात कर्नाटकात जाण्यास तयार असल्याचे राऊत म्हणाले.

बेळगावच्या लढ्यासाठी दिग्गजांनी आपले आयुष्य पणाला लावले. आज महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथले षंढ आणि नामर्द शिंदे सरकार गप्प का बसले? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्लीला विचारणा करा. आता हे चालणार नाही. महाराष्ट्र पेटला तर त्यासाठी देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई दादागिरी करत असताना स्वत:ला भाई म्हणवणारे एकनाथ शिंदे काय करत आहेत. शिंदे स्वत:ला भाई बोलतात, मग आता त्यांनी कर्नाटकविरोधात भाईगिरी करून दाखवावी. मात्र ते गप्प बसले आहेत.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हे सरकार महाराष्ट्राच्या जमिनीचे रक्षण करूच शकत नाही. त्यांना एक क्षणही सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. मागील ५५ वर्षांत महाराष्ट्राने इतके हतबल सरकार आणि मुख्यमंत्री बघितला नव्हता. सरकारच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला न जाण्याचा निर्णय घेऊन शेपूट घातले. हे कसले मर्द आणि स्वाभिमानी. हे तर नामर्दांचे सरकार आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

Team Global News Marathi: