नाराज वसंत मोरेंबाबत दोन दिवसात घेणार निर्णय

 

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते माजी शहराध्यक्ष वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज असून लवकरच ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची साथ सोडत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: माध्यमांसमोर ही नाराजी बोलून दाखवली. त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खुली ऑफर दिल्यानंतर तर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या शक्यताही वर्तवण्यात येत आहेत.

मनसे पक्षात माझ्या बाबत ज्या काही घडामोडी सुरु आहेत. त्याला बाबू वागसकर हेच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. पण असे असले तरी मी आजही अध्यक्ष राज ठाकरें यांच्यासोबतच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (७ डिसेंबर) पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर बाबू वागसकर यांना मोरे यांच्या नाराजीबाबत विचारण्यात आले.

याबाबत वागसकर म्हणाले की, वसंत मोरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबद्द्लची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असली तरी या मुद्द्यावर पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली नाही, पण येत्या दोन दिवसात याबाबच सविस्तर खुलासा केला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.पुणे महापालिकेने शहरी गरीब योजना बंद केली. करदात्यांना ४० टक्के सवलत मिळावी, यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या दोन विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही लवकरच आंदोलन करणार असल्याचेही वागसकर यांनी सांगितले.

 

Team Global News Marathi: