ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी भाजपाला सोडचिट्टी देत केला काँग्रेसमध्ये प्रवेश

चंदगड तालुक्यातील ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांची आज पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी केली आहे. गेली पाच वर्ष भारतीय जनता पक्षात असणारे गोपाळराव पाटील यांनी भाजपाच्या प्रदेश पक्षनेतृत्वावर टीका करत विनाअट काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

चंदगड तालुक्यात गोपाळराव पाटील यांच्या गटाचा मोठा राजकीय दबदबा नेहमीच राहिला आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते नरसिंग गुरुनाथ पाटील आणि गोपाळराव पाटील यांच्यात मेहुण्या-पाहुण्याचं नातं आहे. मात्र राजकीय घडामोडीनुसार या दोघांनी वेगवेगळी वाटचाल केली. दौलत साखर कारखान्यात वेगवेगळ्या पदावर काम करत त्यांनी २००१ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता.

त्यांना २००४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. तर, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर यांच्याशी त्यांचा सामना झाला. मात्र फार थोड्या फरकाने या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या भाजपा प्रवेशामुळं चंदगड विधानसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलून गेलं. गेली ५ वर्षे ते भाजपमध्ये राहिले. पण या ५ वर्षांत भाजप नेतृत्वाने आपल्याला बाजूला ठेवले आपल्याकडं दुर्लक्ष केले, असा आरोप करत त्यांनी आज कॉंग्रेस पक्षात निवडक २५ प्रमुख कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

Team Global News Marathi: