ज्येष्ठ पत्रकार, ‘लोकमत’चे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांचं निधन

मुंबई : तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोना झाला होता. डेंग्यू बरा झाला मात्र लंग्ज इन्फेक्शन ८० टक्के होते. नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. गुरुवारी रात्री त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र पहाटे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला, आणि पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

रायकर यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. मुंबईत राहण्यासाठी घर नसल्याने ते इंडियन एक्स्प्रेसच्याच कार्यालयात राहत होते, तिथेच काम करायचे. टीपी ऑपरेटर, रिपोर्टर ते डेप्युटी एडिटर असा यशस्वी प्रवास त्यांनी एक्स्प्रेस समूहात केला. लोकसत्तामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी लोकमतसमूहामध्ये संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. सुरुवातीला ते औरंगाबादचे संपादक होते. त्यांनी गेली काही वर्षे लोकमतमध्ये समूह संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली.

दांडगा जनसंपर्क, राज्यभरातील पत्रकारांशी जवळचे संबंध, कसलीही मदत लागो, मदतीला धावून जाणे असा त्यांचा स्वभाव होता. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने रायकर यांना सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

रायकर यांना पुढारीकार ग.गो.जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे, मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: