सेनेनं मुर्मूंना पाठींबा दिल्याने काँग्रेसला धक्का? पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही

 

शिवसेनेने अखेर एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला आहे. पाठींबा जाहीर करताना आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, या निर्णयानंतर महाविकासआघाडीतील घटक पक्ष काँग्रेस नाराज झाला आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, अशी खंत काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असं मतही थोरातांनी व्यक्त केलं. त्यामुळे भविष्यात काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग राहिला का? असा प्रश्न आता उपस्थित होते आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Team Global News Marathi: