जळगाव | राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार चांगलाच जोर धरू लागला आहे. त्यामुळे राज्यभर जोरदार प्रचारसभा गाजताना देखील दिसत आहेत. अशातच आता जळगावात खडसे विरूद्ध महाजन आमने सामने आल्यानं चांगलंच वातावरण तापल्याचं पहायला मिळतं आहे.
जळगावातील खडसे-महाजन या दोन दिग्गज नेत्यांनी काही अंतरावरच प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी चांगलंच वातावरण तापल्याचं पहायला मिळालं. यावेळी गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर तसेच सभा घेत असलेल्या एकनाथ खडसेंवर टीका केली आहे. आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही, आता पावशेर झालात, असं महाजन म्हणाले आहेत.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो आणि स्वत:च्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास झालाय, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. विकास मात्र भकास आणि स्वत:ला मोठा नेता म्हणे, असा टोला देखील महाजनांनी खडसेंना लगावला आहे. तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला धडा शिकवला आहे, असंही महाजन म्हणाले आहेत.