जप्त कागदपत्रांच्या आधारे तपास, मलिकांवर उपचार सुरू असल्याने ईडीचा निर्णय

 

मुंबई | गोवावाला बिल्डिंग कंपाउंडच्या खरेदी व्यवहारावरून ईडी कोठडीत असलेले अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे चौकशी सुरू आहे. ते सध्या जे जे रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे जप्त केलेल्या कागदपत्राच्या आधारे ईडी अधिक तपास करीत आहे. कुर्ल्यातील मोक्याच्या अशा एलबीएस मार्गावर तीन एकरात पसरलेले गोवावाला बिल्डिंग कंपाउंडमध्ये, चार मजली, सात रहिवासी अपार्टमेंट, चाळी, दुकान गाळे आहेत. ही मालमत्ता नवाब मलिक यांच्या नूर मंजिल या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे.

मलिक आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसिना पारकर यांच्यातील कथित आर्थिक व्यवहाराचा भाग आहे. नवाब मलिक यांनी कुर्ला जनरल स्टोअर्स नावाने या कंपाउंडमधील पाहिली मालमत्ता १९९२ मध्ये ताब्यात घेतली होती. काचवाला यांच्या मालकीची ही मालमत्ता होती. त्या काळात मलिक हे एक येथील पॉवरफुल व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच काचवाला यांनी ही मालमत्ता मलिक यांना दिली.

तसेच ही मालमत्ता मलिक यांचे भाऊ अस्लम यांच्या नावावर करण्यात आली होती. पुढे मलिक यांनी कंपाउंडची जागा हसिनाचा खास हस्तक सलीम पटेल याच्या माध्यमातून एका कुलमुखत्यारचा गैरवापर करीत ५५ लाखांत मिळवल्याचे ईडी तपासात समोर आले आहे.सध्या मंत्री नवाब मलिक यांना मूत्रपिंडाची समस्या असल्याचे निदान झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मलिक यांना ईडीने बुधवारी अटक केल्यानंतर सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय दाखल करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: