सिंधिया समर्थक अपमानास्पद वागणूक देतात, भाजप खासदाराची पक्षश्रेष्टींकडे तक्रार

 

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी गुना मतदारसंघातून मोठ्या फरकाने हरवणारे भाजप खासदार कृष्णपाल सिंग यादव हे सध्या भाजपवर नाराज आहेत. सिंधिया भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं आहे. सिंधीया मंत्री झाल्यापासून त्यांचे समर्थक आपल्याला अपमानास्पद वागणूक देतात, असा आरोप त्यांनी भाजपा अध्यक्षांकडे केला आहे.

राज्यात सिंधिया यांचे समर्थक मंत्री व कार्यकर्ते भाजपच्या तत्वांच्या विरोधात जाणाऱ्या भूमिका घेतात. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडतो. तसेच जनतेतही चुकीचा संदेश जात आहे. ‘माझ्या मतदारसंघातील अधिकारी कार्यकर्ते यांना सिंधिया समर्थक चुकीची वागणूक देत आहे. त्यांना कार्यक्रमांची आमंत्रणं दिली जात नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं’, असा आरोप यादव यांनी पत्रातून केला आहे.

मार्च २०२० ला तत्कालिन काँग्रेस नेते ज्य़ोतिरादित्य सिंधिया हे २२ आमदारांसह काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यामुळे त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये सत्तेत असलेले काँग्रेसचे सरकार पडले होते व त्यानंतर बहुमताच्या जोरावर भाजपने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व त्यांना हवाई वाहतूक मंत्रीपद देण्यात आलं होत.

Team Global News Marathi: