सावरकरांच्या बरोबरीनं बाळासाहेबांनाही ‘भारतरत्न’ द्या, ते हिमालयापेक्षाही मोठे

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी आमची आग्रही मागणी आहे आणि हिंदुहृदयसम्राटांविषयी खरंच तुम्हाला इतकं प्रेम वाटत असेल तर बाळासाहेबांनाही भारतरत्न मिळावा, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. यानिमित्तानं संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिंना अभिवादन केलं. बाळासाहेबांच्या विचारांची मशाल निष्ठावंतांच्या हातात आहे आणि त्यांचे विचार कुणीही असे हिरावून घेऊ शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

“बाळासाहेबांनी महाराष्ट्राला सह्याद्रीचं बळ दिलं. कारण ते स्वत: हिमालयापेक्षा मोठे नेते होते. देशात दुसरे बाळासाहेब निर्माण होणार नाहीत. त्यांनी आपल्या परखड विचारांनी आणि भूमिकांनी राज्यासह देशाला दिशा दिली. आता बाळासाहेबांच्या नावानं जे तोतये निर्माण होणार आहेत ते भंपक असून फारकाळ टीकणार नाहीत. सत्तेत असलेल्यांनी वीर सावरकरांबाबतचं ढोंगी प्रेम दाखवू नये. खरंच हिंदुहृदयसम्राटांविषयी प्रेम वाटत असेल तर वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न का जाहीर झालेला नाही. त्यांच्यासोबतच बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न मिळायला हवा. खरंतर पुरस्काराने काही या व्यक्ती मोठ्या होणार नाहीत. उलट पदव्या मोठ्या होतील असे हे नेते आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“राज्याच्या राजकारणात सध्या ज्यापद्धतीनं एकमेकांबद्दल बोललं जात आहे. टीका केली जात आहे. ते पाहता आज जर बाळासाहेब असते तर अशाप्रकारचे कमरेखालचे घाव झालेले त्यांनी कधीच सहन केले नसते आणि अशा लोकांची अवस्था फार वाईट करुन सोडली असती”, असं संजय राऊत म्हणाले. पक्षाशी गद्दारी केलेले लोक फार काळ राज्याच्या राजकारणात टीकणार नाहीत. सगळे उघडे पडतील, असही ते म्हणाले.

Team Global News Marathi: