सत्तेत लवकर येणार, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंचं सूचक वक्तव्य

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. यावेळी आम्ही सत्तेत लवकरच येणार, असं सूचक वक्तव्य अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. मात्र येणारी सत्ता मुंबई महापालिकेत येणार की राज्यात, हे अस्यप गुलदस्त्यात आहे.

मात्र याआधीही अमित ठाकरेंना शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर शिंदे गट-भाजप-मनसे यांची महायुती होणार असल्याची चर्चाही जोरावर आहे.
अमित ठाकरे यांनी दादर चौपाटीवर जाऊन स्वच्छता मोहीम हाती घेतली. ‘चौपाटीवर येऊन पाहायला लागणारं दृश्य उत्साही नाही. मला खूप वाईट वाटतंय’ असं बोलता बोलता अमित ठाकरेंनी हुंदका गिळला. दहा दिवस जल्लोषात बाप्पाची सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी दिसणारं दृश्यं पाहवत नाही, अशा भावना अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या. काल रात्री तीन वाजेपर्यंत शिवतीर्थासमोरुन गणपती विसर्जन मिरवणुका सुरु होत्या, दोन-अडीच वर्षांच्या करोना काळानंतर यावर्षी सर्वच सणांमध्ये उत्साह वेगळाच आहे, असंही अमित म्हणाले

समुद्र किनाऱ्यांच्या साफसफाईबाबत कायम स्वरुपी यंत्रणा उभारणार का, असा प्रश्न विचारताच आम्ही सत्तेत आल्यावरच ते करु, जे लवकरच होईल, कारण त्यासाठी यंत्रणा हातात लागते, असं सूचक वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं.

Team Global News Marathi: