कोल्हापूर | महाडिक आणि पाटील हे वैर साऱ्या पश्चिम महाराष्ट्राला परिचित आहे. त्यातच राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेले माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘पालकमंत्री सतेज पाटील हे मंत्रिपदाच्या बळावर दुष्ट आणि क्रूरतेचे राजकारण करत आहेत. मंत्रिपदाचा गैरवापर करून राजकीय विरोधकांचे उद्योगव्यवसाय मोडीत काढण्याचे पाप करत आहेत असा आरोप महाडिक यांनी लगावला आहे.
तरुण वयात त्यांना मंत्रिपद मिळाले आहे, त्या मंत्रिपदाचा वापर त्यांनी समाजाच्या सदुपयोगासाठी करावा. हे सत्ताचक्र आहे, ते बदलणारे असते. उद्या आमची सत्ता आल्यावर तुम्हाला ते झेपणार नाही अशा शब्दांत भाजप प्रवक्ते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना इशारा दिला. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कारभाराचा समाचार घेतला.
महाडिक म्हणाले, ‘सध्या साखर उद्योग अडचणीत आहे. साखर उद्योग संकटातून बाहेर पडावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करत आहेत. मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक हे थकीत एफआरपी वरून भीमा कारखान्यावर कारवाई व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार विभागाकडे तक्रार करत आहेत. मंत्री पाटील आणि खासदार मंडलिक हे त्यांच्या लेटरहेडवरून अशा तक्रारी करत असतील तर ते चुकीचे आहे.
खासदार, आमदार आणि मंत्रिपद हे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, शहर विकासासाठी नवनवे प्रकल्प आणण्यासाठी असते. मात्र हे दोघे जण मंत्रिपद आणि खासदारकीचा वापर भीमा कारखान्यावर कारवाईसाठी करत आहेत. पालकमंत्री पाटील हे मनोरुग्ण आहेत. राजकीय विरोधकांचे उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त झाले पाहिजेत अशा विकृत मानसिकतेतून ते काम करत आहेत असा आरोप लगावला आहे.