राष्ट्रवादीच्या मंथन बैठकीला गैरहजर, अजित पवारांनी स्पष्ट सांगितले

 

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आज, या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. अजित पवारआज मावळच्या दौऱ्यावर आहेत.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते. मात्र, अजित पवार हे अनुपस्थित असल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती. तसेच सत्तधारी पक्षांनी याच मुद्द्यावरून राजकारण सुरु केले होते.

दरम्यान राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, अजित पवार यांनी मौन बाळगल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. अजित पवार यांनी सोशल मीडियावरही प्रतिक्रिया नोंदवली होती. मात्र, त्याच वेळी अजित पवार यांनी आर्थिकदृष्ट्या मागासघटकांना आरक्षण देण्याचा निर्णय वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. अजित पवार यांनी त्याचे स्वागत केले होते.

जवळपास सात दिवसानंतर अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाच दिवस कुठे होतो, याचा उलगडा केला आहे. अजित पवार यांनी म्हटले की, पाच दिवस आजारी होतो. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत त्यांनी चर्चांना पूर्ण विराम लावला.

Team Global News Marathi: