सरकारकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, मात्र बुलेट ट्रेनवर सहा हजार कोटींची उधळपट्टी

 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना देण्यासाठी राज्यातल्या नव्या सरकारकडे पैसे नाहीत, पण गुजरातच्या हिताच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला देण्यासाठी या सरकारकडे सहा हजार कोटी रुपये आहेत अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्य सरकारच्या हिश्श्यापोटी सहा हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर नाना पटोले यांनी टीका केली.

राज्यात अतिवृष्टीमुळे विदर्भ व मराठवाडय़ातील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे, परंतु राज्य सरकारला आपल्याच राज्यातील शेतकऱयांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प जास्त महत्त्वाचा वाटतो. या बुलेट ट्रेनसाठी या सरकारकडे पैसा आहे, पण शेतकऱयांसाठी नाही हे दुर्दैवी आहे. या सरकारचे भवितव्य अजूनही कोर्टात टांगणीला लागले आहे, पण कोर्टाचा निकाल येईपर्यंत थांबण्यास यांना वेळ नाही. हे सरकार असंविधानिक आहे, पण आमदारांमधील नाराजी वाढू लागल्याने आणि शेवटी दिल्लीच्या सात फेऱया केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीच्या हाय कमांडकडून हिरवा कंदील मिळाल्याचे दिसते असे नाना पटोले म्हणाले.

या सरकारमध्ये भ्रष्टाचाऱयांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले जात आहे. दुसऱया पक्षातील लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणांमार्फत कारवाया करावयास लावायच्या व स्वतःच्या सरकारमध्ये मात्र भ्रष्ट लोकांना मंत्रीपद द्यायचे यातून भाजपचा खरा चेहरा दिसून येतो.

 

Team Global News Marathi: