“.महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा थेट भाजपला इशारा

 

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून एकनाथ शिंदे गट व भाजपने सत्ता स्थापन केली. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवून निकालानंतर फारकत घेतलेल्या शिवसेनेमध्ये उभी आडवी फूट पडली आहे. शिवसेनेतील बहुतांश आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत ठाकरे ब्रँडपासून फारकत घेतली आहे. एकीकडे शिंदे गट व भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाचं बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्यानंतर ते विरोधकांच्या महागठबंधनमध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासमवेत नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत १६४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आपल्या पक्षातील सर्व नेत्यांनी भाजपपासून फारकत घ्यावी अशी भूमिका मांडल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. कुमार व यादववं यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत तेजस्वी यादव यांनी देखील भाजपवर तोंडसुख घेतले.

“हा आजपर्यंतचा इतिहास आहे की, ज्या ज्या पक्षांसोबत भाजपने मैत्री केली, त्याच पक्षांचा नंतर भाजपने सर्वनाश केला. हेच आपल्याला पंजाब आणि महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाले. बिहारमध्ये भाजपला आता एकही मित्रपक्ष नाही. सर्वांना माहिती आहे, बिहारमध्ये भाजप काय करू पाहत होता.” असा घणाघात यादव यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रीय जनता दल हा संख्याबळाच्या बाबतीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. सध्या बिहारमध्ये राजदचे 79 आमदार आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार आहेत. असं असलं तरी तेजस्वी यादव यांच्या पक्षाच्या 18 आमदारांवर अपात्र ठरवले जाण्याची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्षांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप या 18 आमदारांवर होता. त्याकरता एक समितीही स्थापन करण्यात आली होती.

Team Global News Marathi: