संजय राऊतांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

 

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या नव्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलंच गाजलं. रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यात संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न. सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, दिगंबर कामत, गिरीश चोडणकर यांचे फोन टॅपिंग सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर गोव्यातील रश्मी शुक्ला कोण?, असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीमधील मंत्र्यांचे व जेष्ठ नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता.

Team Global News Marathi: