“संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार”

 

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. यातच आता यासंदर्भात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार, सगळा हिशोब द्यावा लागणार, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत, संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी, अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? असा सवाल करतानाच राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राऊत आणि तत्कालीन सरकारने माफिया पद्धतीने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले होते. संजय राऊत हे प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकणार असल्याचे सांगत होते. धमक्या देत होते. काही लोकांना आतही टाकले आहे. पत्राचाळमध्ये १२०० कोटींचा घोटाळा झाला. त्यासोबत नायगाव वसई प्रकरण बाहेर यायचे आहे. संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा हिशोब होणार आहे, अशी घणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी केली.

Team Global News Marathi: