‘संजय राऊतांना मातोश्रीने बाजुला करावं, अजूनही शिवसेना एकत्र येऊ शकते’

 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेआणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संजय राऊत प्रचंड टीका करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांच्या मनात संजय राऊत यांच्याबद्दलची प्रतिमा चांगली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे मुख्य शिवसेनेत असलेल्या आमदार-खासदार आणि नेत्यांमध्ये बंडखोरांविरोधात रोष आहे.

दुसरीकडे बंडखोरांच्या गोटातील आमदारांचा संजय राऊत यांच्याविरोधात रोष आहे. विशेष म्हणजे एवढं सारं होऊनही बंडखोर आमदारांनी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केलेली नाही. याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी शिवसेना पुन्हा एक होऊ शकते.

पण त्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याची सूचना विजय शिवतारे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर अजूनही शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. मातोश्रीने फक्त संजय राऊतांसारख्यांना बाजुला केलं पाहिजे, असं मोठं विधान विजय शिवतारे यांनी केलं आहे. विशेष म्हणचे शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांपैकी फक्त शिवतारेच नाही तर अनेक आमदारांनी आतापर्यंत याबाबत भाष्य केलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप आणि टीका करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोठा इशारा दिला आहे. ठाकरे कुटुंबावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही हे किरीट सोमय्या यांनी लक्षात ठेवावं. अन्यथा आम्हाला सत्तेची देखील पर्वा करणार नाही, असं विधान संजय गायकवाडांनी नुकतंच केलं होतं.

त्यानंतर आता शिवतारे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे बंडखोर आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ‘उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर नक्की जाऊ…’ या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये सामंजस्य होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे भेटणार असतील तर आम्ही मातोश्रीला नक्की जाऊ. मात्र आम्ही थेट उद्धव ठाकरेंना भेटू. मात्र यादरम्यान त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बाहेर ठेवायला हवं. अशावेळी केसरकरांचा निशाणा हा संजय राऊतांवर असल्याचं मानलं जातं.

Team Global News Marathi: