संजय राऊतांविरोधात मराठा समाज आक्रमक; पोस्टर जाळून केला विरोध

 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या महामोर्च्यावर नॅनो मोर्चा अशी टीका भाजप-शिंदे गटाने केली. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी काल मुंबईतील महाविकास आघाडीतील मोर्च्याचा व्हिडीओ ट्विट केला. मात्र हा व्हिडीओ मराठा क्रांती मोर्च्याचा आहे, असा दावा भाजपने केला आहे. राऊतांनी खोटेपणा करत मराठा मोर्च्याचा व्हिडीओ वापरल्याचा आरोप करत मराठा संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आज संजय राऊत यांचे पोस्टर्स जाळण्यात आले. राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

दरम्यान, स्वराज्य संघटनेचे नेते अंकुश कदम यांनी राऊतांविरोधात घणाघाती टीकाही केली. मराठा क्रांती मोर्च्याच्या मूक मोर्च्याला हिणवणाऱ्या राऊत यांनी आमच्या मोर्च्याचा व्हिडीओ का वापरला? असा प्रश्न त्यांना विचारावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनीही काल ट्विटरवरून राऊत यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ज्या मोर्च्याला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले, तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्च्याची चेष्टा करणारे तुम्हीच होता.

आज नसलेली ताकद दाखवताना जरा तरी तमा बाळगा, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला. यासोबतच, शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनीदेखील संजय राऊतांवर ट्विटरद्वारे टिप्पणी केली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही दुधखुळी समजता काय? तुमच्याकडे काही उरले नाही, हे मान्य करा. गिरे तो भी टांग उप्पर… त्यांना काय म्हणतात माहिती आहे नं… अशा शब्दात म्हस्के यांनी राऊतांना फटकारले

Team Global News Marathi: