सीमावासीयांसाठी भुजबळांनी मार खाल्ला, त्यांच्यामुळे आम्हालाही मार मिळाला

 

राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक राज्य सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आक्रमक असलेल्या विरोधकांपुढे राज्य सरकारची कसोटी लागणार आहे. दरम्यान, बेळगाव सीमावासीयांच्या मुद्द्यावरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत प्रश्न मांडला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तरे दिली. “सीमावासीयांसाठी छगन भुजबळांनी मार खाल्ला आहे, त्यांच्यामुळे आम्हालाही मार मिळाला आहे.” असे त्यांनी सांगितले.

“अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण पहिल्यांदाच या विषयाला गांभीर्याने घेत देशाच्या गृहमंत्र्यांनी हस्तेक्षप करत मध्यस्थी केली. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याने त्यांनी बैठक घेतली. आमच्या लोकांना, गाडयांना अडवले जात आहे. यावर आमच्याकडूनही प्रतिक्रिया उमटवू शकतात, असेही आम्ही त्यांना म्हणालो.” असे त्यांनी सांगितले.

“अमित शहा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही सूचना केल्या आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. त्यांनी स्वत: बाहेर येऊन केंद्र सरकारची भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतल्याचे अभिनंदन करायला हवे होते. यापूर्वी कोणती सरकार केंद्रात, महाराष्ट्र आणि कर्नाटकात होती हे सर्वांना माहिती आहे. एकीकरण समितीने जे आंदोलन पुकारले आहे, यापूर्वी असे आंदोलन कधी झाले तसेच कोणत्या सरकारने परवानगी दिली याचीही माहिती घ्या. सीमाभागातील लोकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत.” असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: