कोरोना लढाईतील ठाणेकरांचं काम मार्गदर्शक, संजय राऊतांनी केले कौतुक

 

ठाणे | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या कार्यक्रमावेळी कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार सरनाईक यांच्या वतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तर आज ठाण्यातील प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले की, जे कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळत नाहीत ते त्याच्या संसर्गाला आमंत्रण देतात. रुग्ण वाढले की, ऑक्सिजनची मागणी वाढते. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची गरज भासते. कोरोना लढाईत ज्याप्रकारे ठाणेकरांनी काम केलं आहे ते मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: