निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी : निकिता शिंदे : मुंबई : २०२१ या वर्षाचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन  हे मुंबईत १ मार्च २०२१ ते दिनांक १० मार्च २०२१ या कालावधीत होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारची  पत्रकार परिषद झाली आहे. पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठल्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

तपास नि:पक्षपातीपणाने झाला पाहिजे : मुख्यमंत्री

सरकार चालवताना आमची जबाबदारी असते ती म्हणजे न्यायाने वागणं. पण गेल्या काही महिन्यांत एकूणच गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे. तपास हा झालाच पाहिजे पण हा तपास नि:पक्षपातीपणाने झाला पाहिजे. जर कोणी दोषी असेल तर तो कोणी किती मोठा असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे ही सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. या तपासावर आणि तपास यंत्रणेवर कोणालाही सोडवायचं म्हणून दडपण असू नये त्यासोबतच एखाद्याला लटकवयाचच आहे, त्याला आयुष्यातून उठवायचंच आहे असंही असू नये. हे मी मुद्दाम सांगतोय कारण गेल्या काही दिवसांपासून अशा काही गोष्टी, घटना घडत आहेत की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

संजय राठोड यांनी स्वत:हून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राजीनामा घेणं आणि गुन्हा दाखल करुन मोकळं होणं म्हणजे न्याय देणे नव्हे. ज्यावेळी ही घटना घडल्याचं आम्हाला कळलं त्याचक्षणी या घटनेची निपक्षपणे तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांना तशा सूचना दिल्या आहेत की, एक कालबद्ध ठरवा आणि लवकरात लवकर तपासाचा अहवाल सादर करा.

या तपासातून जे सत्य बाहेर येईल त्यात कोणी आरोपी असेल त्याला क्षमा होणार नाही. पण हे सर्व सुरू असताना नुसती आदळ आपट करुन तपासाची दिशा भरकटून टाकायची हा काही प्रकार सुरू आहे ते गंभीर आहे. आधी चौकशी नीट होऊ द्या. ज्या तपास यंत्रणेवर तुमचा अविश्वास आहे ती तपास यंत्रणा तिच आहे तुमच्याकाळातही हिच तपास यंत्रणा होती.

वनखात्याचा कारभार सध्या माझ्याकडे : मुख्यमंत्री 

वनखात्याचा कारभार आता सध्या माझ्याकडे आहे. विधानसभेत या खात्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर मी किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री त्याला उत्तर देतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: