संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली सही

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्यानंतर आघाडी सरकारच्या अडचणी थांबवण्यासाठी मंत्री राठोड यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र ह्या राजीनाम्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांनी सही करून पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे न पाठवल्याचा आरोप विऱोधकांनी केला होता.

मात्र आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असून तो आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून लवकरच गच्छंती होणार आहे.

अनेक दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने भाजपाकडून टीका करण्यात आली होती. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल भाजपाने केला होता. मात्र आता या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही करून पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे अशी माहिती मिळत आहे.

Team Global News Marathi: