कन्नड : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जादव यांच्यातील वाद आता जगजाहीर झाले आहे. त्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जाधव-दानवे अशी चांगलीच लढत पाहायला मिळाली होती. त्यातच आता हर्षवर्धन जाधव यांनी संजना यांना आता संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. यावर अद्याप त्यांच्या पत्नीने काहीही भाष्य केलेले नाही.
मागच्या अनेक दिवसांपासून इशा झा हर्षवर्धन जाधव यांच्या बरोबर अनेक कार्यक्रमात हजेरी लावताना आढळून आल्या आहेत. विविध संभारंभ तसेच कार्यक्रमांमध्ये इशा झा सर्व उपस्थिताचे लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे संजना जाधवही राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. संजना जाधव या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार समारंभात दिसून येत आहेत.
अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात संजना जाधव या माझी पत्नी म्हणून कन्नड-सोयगाव मतदारसंघात फिरत आहेत. ज्या पतीला तुम्ही हा माणूस बरोबर नाही असं म्हणताय, त्याच्या नावाने फिरणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. यावर आता संजना जाधव काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.