साने गुरुजी ते आलूरे गुरुजी…शिखर बँकेचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते सि. ना आलुरे गुरुजी कालवश

साने गुरुजी ते आलूरे गुरुजी…शिखर बँकेचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते सि. ना आलुरे गुरुजी कालवश

तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रामप्पा नागप्पा आलुरे उर्फ सि. ना आलुरे गुरुजी यांचे सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले..
आलूरे गुरुजी चारित्र्य,संस्कार,गुणवत्ता आणि अखंड ज्ञानाचा स्रोत होते..त्यांना पाहिले की आपोआप आपले हात त्यांच्या पायाकडे जायचे..एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आलूरे गुरुजी..

मंदिराच्या परिसरात भरणारी ती शाळा एक आदर्श गुणवत्तेचे मूर्तिमंत उदाहरण होते..गुरुजींनी हे सगळे प्रयत्नातून निर्माण केले होते..सोबत जो शिक्षक वर्ग होता,तोही त्यांच्या विचाराने भारावलेला होता..गुणवत्तेच्या एक एक कसोटी पूर्ण करत गुरुजींची संस्था एक एक टप्पे पूर्ण करत होती,गुरुजींच्या सामाजिक कार्याची ओळख शिक्षणासोबत परिसरात व्हायला लागली होती.

सार्वजनिक जीवनातही गुरुजींची प्रतिमा दिवसेंदिवस आदर्श होत चालली होती..लातूरचा पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा असल्याने लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणात हे नाव आवर्जून घेतले जात असे..शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख या दोन्ही गटाच्या आघाडीवर जरी गुरुजींचे नाव अग्रेसर असले तरी,भाऊबंदकीच्या राजकारणात आणि भ्रष्ट राजकारणाच्या उंबरठ्यावर गुरुजी फार काळ थांबले नाहीत.

त्यांनी तुळजापूर तालुक्यातील गावोगावी माध्यमिक शाळा, वसतिगृहे स्थापन करून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली..लातूर येथील महात्मा बसवेश्वर कॉलेज या शिक्षण संस्थेचे ते उपाध्यक्ष होते,मोठ्या प्रमाणावर या संस्थेत सुविधा व गुणवत्ता निर्माण करण्यासाठी त्‍यांनी मोठे योगदान दिले आहे.सिद्धेश्वर सहकारी बँक लातूरचे संस्थापक विद्यमान संचालक व माजी चेअरमन होते,त्यांनी ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची व व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले..

बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्गचे ते विद्यमान कार्याध्यक्ष होते ,संस्थेच्या माध्यमातून नळदुर्ग व तुळजापूर येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय चालू करून त्यांनी शहरी भागात शिक्षणाची सोय करून युवकांना मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.राज्य सहकारी बँक (शिखर बँक) मुंबईचे माजी चेअरमन ते होते आणि अनेक वर्षे ते संचालक होते.

गुरुजी सहकार,शिक्षण,ग्रंथालय चळवळ आणि राजकारण असा चतुरस्त्र प्रवास करत जगले,मात्र शिक्षणात ते रमत राहिले..राजकारण त्यांना फार पचनी पडले नाही..भ्रष्ट आणि लाचार व्यवस्थेपुढे ते फार काळ टिकले नाहीत..जातीय राजकारणापूरता त्यांचा वापर फक्त व्यासपीठावर बसण्यापूरता केला गेला..उस्मानाबादच्या राजकारणात गुरुजींची आदर्श आचारसंहिता वापरली गेली असती तर कदाचित त्या जिल्ह्याला एक वेगळे महत्व राहिले असते..

अणदूर परिसरात त्यांनी एकूण २८ शाळा सुरु केल्यात. तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्ष होते.

आलुरे गुरुजींचा जन्म ६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीडच्या पाटोदा तालुक्यात त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरु केलं होतं. त्यानंतर ते अणदूरच्या जवाहर विद्यालयात रुजू झाले होते. तिथूनच ते मुख्याध्यापक म्हणून १९९० साली निवृत्त झाले. शिक्षण प्रसारक मंडळामार्फत आलुरे गुरुजी यांनी अणदूर आणि त्याच्या ग्रामीण परिसरात विविध गावांत २८ शाळा सुरु केल्या.

सिद्रामप्पा आलुरे गुरुजी हे १९८० मध्ये काँग्रेसकडून प्रथमतः आमदार झाले. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार माणिकराव खपले यांचा १४ हजार ५७९ मतांनी पराभव केला होता. १९८५ ला शेकापचे माणिकराव खपले पुन्हा निवडून आले.

 

आदर्श आचारसंहितेचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या आलूरे गुरुजींना भावपुर्ण श्रद्धांजली..

@ संजय जेवरीकर
पत्रकार

ग्लोबल न्युज नेटवर्क: