समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात आंदोलन

 

समृद्धी महामार्गावरून भटकायला वेळ आहे, पण शेतकऱयांच्या व्यथा जाणून घ्यायला मुख्यमंत्र्याना वेळ नाही, असा संताप व्यक्त करत जालन्यातील शेतकऱयांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला.

वीज कापली जात असल्याच्या मुद्दय़ावरून शेतकऱयांनी हा निषेध केला. मात्र त्यांचे म्हणणेही ऐकून न घेता मुख्यमंत्र्यांचा ताफा धूर सोडत महामार्गावरून सुसाट निघून गेला. त्यामुळे शेतकऱयांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून शिंदे सरकारविरोधात आता संतापाची लाट पसरली असून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आज महामार्गावरून निघाला. जालना जिह्यात प्रवेश केल्यावर स्थानिक शेतकऱयांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. राज्यातील शेतकऱयांसमोर वीजकपातीचे मोठे संकट आहे. सरकारकडून शेतकऱयांची वीज कापली जात आहे. त्यासंदर्भात या शेतकऱयांना मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांच्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला, परंतु काळे झेंडे घेतलेल्या शेतकऱयांना पाहताच मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबलाच नाही. तो सरळ पुढे निघून गेला. त्यामुळे संतप्त शेतकऱयांनी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीसाठी आलेले शेकडो कार्यकर्तेही यावेळी महामार्गावर उपस्थित होते, मात्र त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करून ते निघून गेले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून शेतकऱयांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी शेतकऱयांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त शेतकऱयांनी पोलिसांना न जुमानता समृद्धी महामार्गावर काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे ताफ्यातील पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Team Global News Marathi: