सामनातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर संजय राऊतांनी साधना निशाणा

 

उत्तर प्रदेशच्या विकासास गती मिळावी म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वरचेवर मुंबई शहरात पधारत असतात. अतिथी देवो भव’ या नात्याने योगींचे स्वागत आहे, पण मुंबईच्या इंधनावर तुमच्या विकास इंजिनाची गती वाढते. त्यामुळे महाराष्ट्राशी इमान राखा. योगीजी हे भगव्या वस्त्रांतील सत्पुरुष आहेत, पण त्यांच्यात एक राजकारणीही दडला आहे. योगींना उद्या दिल्लीत झेप घ्यायचीच आहे. तेव्हाही इंधन लागेलच, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राऊत अग्रलेखात म्हणाले की , मुंबईतील उद्योगपती, गुंतवणूकदारांनी त्यांच्या राज्यात उद्योग सुरू करावेत यासाठी या भेटीगाठी आहेत. उत्तर प्रदेशच्या विकासास गती मिळावी म्हणून योगी महाराज वरचेवर मुंबई शहरात पधारत असतात. त्यात काही चूक आहे असे वरकरणी आम्हाला वाटत नाही. बिहार, उत्तर प्रदेश ही राज्ये औद्योगिकदृष्टय़ा मागास आहेत व त्या राज्यांतील मोठी लोकसंख्या रोजीरोटीसाठी स्थलांतरित झाली.

मुंबई-दिल्लीत या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एका कळकळीने योगी आदित्यनाथ हे मुंबईस येतात, पण या वेळी येण्याआधी त्यांनी सर्वच वर्तमानपत्रांत पानभर जाहिराती देऊन स्वतःची व आपल्या राज्याची प्रसिद्धी केली. ‘उत्तर प्रदेश हे नवीन भारताचे विकास इंजिन आहे. हे इंजिन तुमच्या व्यवसायाला नवीन वेग देणार,’ असे या जाहिरातीत म्हटले आहे.

उत्तर प्रदेश हा ‘एक्सप्रेस प्रदेश’ असून 6 एक्सप्रेस वे, 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असल्याची माहिती योगींनी त्यांच्या जाहिरातीत दिली. उत्तर प्रदेश हे विकासाचे इंजिन आहे व त्या इंजिनात इंधन भरण्यासाठी योगींचे विमान मुंबईत उतरले. मुंबईतील बडय़ा उद्योगपतींवर प्रभाव टाकण्यासाठी योगीजी अवतरले व त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे, पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत ‘रोड शो’ करण्याची गरज काय? ताजमहल पॅलेस या कुलाब्यातील हॉटेलजवळ उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासासाठी योगी रोड शो करणार असल्याचे प्रसिद्ध झाले, पण प्रत्यक्षात हा रोड शो खरेच झाला काय? योगींच्या रोड शोमध्ये नक्की कोणते उद्योगपती सामील झाले व त्यांनी योगी महाराजांवर त्या रोड शोमध्ये किती दौलतजादा, म्हणजे गुंतवणूक केली यावर सुद्धा प्रसिद्धी होऊ द्या असा प्रश्न उपस्थित केला होता.

Team Global News Marathi: