संभाजीराजेंनी शिवबंधन बांधून राज्यसभा लढवावी; शिवसेनेची ऑफर

 

राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज पहिल्यांदाच यासंदर्भात संजय राऊतांनी उघडपणे भाष्य केलं. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती शिवसेनेनं दिलेली ऑफिर स्विकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तोच पक्ष पुढे नेईल. फक्त खास राज्यसभा निवडणुकांवरच चर्चा झालेली नाही. इतर अनेक विषयांवरही चर्चा झाली. आजच्या बैठकीला इतरही काही आमदार होते. विनायक राऊतही होते. अनेक विषयांवर चर्चा सुरु आहे.”

मराठा संघटना प्रमुखांच्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले की, “मराठा संघटना प्रमुखांचंही काही म्हणणं आहे. संभाजीराजे छत्रपतींचंही काही म्हणणं आहे. तसेच, शिवसेनेचाही मुद्दा आहे. आम्हा सर्वांचं, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की, सहावी जागा शिवसेनेची आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरुन लढेन आणि विजयी होईल.

तसेच यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं बोललं जात आहे, त्याबाबत विचारल्यावर बोलताना संजय राऊतांनी पुन्हा सहावी जागा ही शिवसेनेचीच असेल, असं म्हटलं. तसेच, संभाजीराजे छत्रपती हे आमचेच आहेत. त्यांचं आमचं एक नातं आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, तुम्हाला जर ही निवडणूक लढायची असेल, तर शिवसेनेत या मग त्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. यामध्ये कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही.”

 

Team Global News Marathi: