संभाजीराजें यांच्या राज्यसभा निवडणुकीवर आज होणार फैसला, शरद पवार बजावणार महत्वपूण भूमिका

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेत प्रवेश करा, असा संभाजीराजेंना असलेला आग्रह आणि दुसरीकडे संभाजीराजेंची महाविकास आघाडीचा उमेदवार होण्याची तयारी या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय मान्य होणार, याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. मुंबईत याबाबत रविवारी दिवसभर घडामोडी घडल्या. मात्र संभाजीराजे हे केवळ महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती रात्री उशिरा सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांना आज साेमवारी दुपारी मातोश्रीवर निमंत्रण दिले आहे. संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाण्यासाठी शिवबंधन बांधण्याची अट ठाकरे यांनी घातली आहे; परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजपपासून लांब होण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता आणि पुन्हा शिवसेनेत कसे जायचे, असा मोठा प्रश्न संभाजीराजे यांच्यासमोर आहे.

आज शाहू महाराजांचे वंशज म्हणून त्यांना मिळालेले स्थान अबाधित ठेवण्यासाठी त्यांना आपण सर्वपक्षीय आहेत, अशीच प्रतिमा ठेवायची आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तयार नाहीत. राज्यसभेची सहा वर्षांसाठी खासदारकी द्यायची असेल तर पक्षाला नेमका काय फायदा, असा विचार मातोश्रीवर होत असल्याने यातून नेमका मार्ग निघणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

जर ठाकरे संभाजीराजेंच्या शिवसेना प्रवेशावर अडून राहिले आणि संभाजीराजे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारीवर अडून बसले, तर पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. यातून ते काय मार्ग काढणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यातून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून पवार हे संभाजीराजे यांच्या नावावर एकमत घडवून आणतील असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Team Global News Marathi: