अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर व थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर आज राज्य सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची मदतीची घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पूर आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

 पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे –

– अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच भयानक नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे, विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत, विजेचे खांब उलटे पालटे झाले आहेत.

– सगळ्यांचा विचार केल्यानंतर आम्ही आढावा घेतला. या आपत्तीच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून 10 हजार कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.

– हे 10 हजार कोटी रुपये विविध कारणांसाठी असतील. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उध्वस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, या सर्व गोष्टींसाठी 10 हजार कोटी आम्ही जाहीर करत आहोत.

– आज आम्ही 10 हजार कोटी आपत्तीग्रस्त बांधवांसाठी, माता-भगिनींसाठी जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही पूर्ण मदत प्रत्येक आपत्तीग्रस्तापर्यंत पोहोचावी, असा आमचा प्रयत्न राहील.

– जिरायत, बागायत जमिनीसाठी 6 हजार 800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 10 हजार देणार आहोत.

– फळपिकांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल.

– मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येईल.

– एकूण केंद्राकडून येणं 38 हजार कोटी रुपये आहे, पण मिळालेले नाहीत.

– अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे.

दरम्यान, आज पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते

ग्लोबल न्युज नेटवर्क: