खडसे राष्ट्रवादी मध्ये दाखल: त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल, एकनाथ खडसेंचा इशारा

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश दिला त्यासाठी मी शरद पवार यांचा आभारी आहे. आयुष्यातील जवळपास 40 वर्षे भाजपच्या उभारणीसाठी काम केलं. त्यामुळे स्वाभाविक आहे जेथे 40 वर्षे राहिलं तो पक्ष एकाएकी सोडावा वाटला नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया भाजपचे बंडखोर नेते आणि नुकतंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी दिली.

मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, अशी इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.

मला कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती. नाथाभाऊंनी दगडधोंडं खाल्ले आणि तुमची सेवा केली, पार्टीसाठी संघर्ष केला. त्यानंतर तुम्ही काय केलं? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला.

संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की माझा किती छळ झाला, अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही म्हटलं. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपमध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला, असेही खडसे यावेळी म्हणाले.

“कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही”

उत्तर महाराष्ट्रात भाजपला 6 खासदारकीच्या जागा यायच्या. येथे मी सातत्याने 5 जागा जिंकून आणल्या. जळगावातून नेहमी 2 खासदार निवडून दिले. मी संघर्ष केला, समोरासमोर लढलो, पण मी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करुन मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. मी काही लेचापेचा नाही, असेही खडसे म्हणाले.

मला राष्ट्रवादी काँग्रेसने काहीही दिलेलं नाही. मी केवळ पक्षाचं काम करेल. जितकं काम भाजपचं केलं, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू. हे करुन दाखवू. माझ्या पाठीशी ठाम उभे राहा, मी कुणालाही घाबरणार नाही, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

“दिल्लीतील वरिष्ठांनीही राष्ट्रवादीत जाण्यास सांगितलं”

100 टक्के पंचायत समिती, नगरपालिका राष्ट्रवादीच्या राहतील. हे चित्र आम्ही दाखवून देऊ. पक्ष सोडावं हे माझ्या मनात नव्हतं, तर ती कार्यकर्त्यांची भावना होती. राष्ट्रवादीत जावं ही देखील कार्यकर्त्यांची भूमिका होती. अनेक पक्षांनी ऑफर दिल्या होत्या.

दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केली. त्यांना मी विचारलं तर त्यांनीही राष्ट्रवादीत जाण्यास सांगितलं. भाजपमध्ये तुम्हाला भविष्य नाही असंच सांगितलं. भाजपमध्ये अनेकजण आहेत जे तिथं कंटाळले आहेत. पण अनेकांना ईडी मागे लागेल अशी भिती आहे,  असा दावाही एकनाथ खडसेंनी केला.

एकनाथ खडसेंच्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!

गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: