“कोव्हिडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न, त्याला तोंड देऊ शकलो नाही तर मोठे संकट निर्माण होईल”

 

सध्या संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे, तर राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दुसऱ्या बाजूला शासन मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. त्यामुळे लवकरच आपण कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊ, अशा आशा निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, कोव्हिडनंतर राज्यासह देशात रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न निर्माण होईल. या अस्वस्थेला तोंड देऊ शकलो नाही तर फार मोठे संकट निर्माण होईल, असं सूचक प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ या कार्यक्रमात बोलताना हा सूचक इशारा दिला.

मुख्यमंत्री म्हणाले की, अजूनही थोडे दिवस थांबलं पाहिजे. कोरोनाचं संकट खरंच गेलं का? पूर्ण गेलेलं नाही. थोडसं आहे. काही काही तर जुने व्हायरस परत आलेत. ते पण दिसतंय, जुने व्हायरस सुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट्स त्याच्यात आणत आहेत. त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. या जुन्या आणि नव्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, असा इशारा त्यांनी दिला. काहीजण म्हणतील हे उघड केलं, ते उघडं का करत नाही. काही दिवस थांबा. टप्प्याटप्प्याने आपल्याला सर्व उघडं करायचं आहे. एक दिवस हळूवारपणाने मास्कही काढायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भासनातील प्रमुख मुद्दे

• परिसंवादाचे आयोजन केल्याबद्दल एक्सप्रेस ग्रुपचे अभिनंदन

• कोरोना किती दिवस चालेल माहित नाही पण या वातावरणात आपले जीवन पुर्वपदावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, यास आपण सहकार्य करत आहात ही खुप मोठी गोष्ट.
• उद्योग क्षेत्र, शासन यांचे हे गेट टु गेदर… आहे असे मला वाटते.• आज आपल्यासमोर असलेले आव्हान मोठे आहे
• कोरोना काळात मी केलेल्या कामाचे श्रेय माझे एकट्याचे नाही ते आपल्या सर्वाचे. मंत्रिमंडळ सदस्य, उद्योजक, नागरिक आणि माध्यमे यांचे सुद्धा. आपण सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आपण हे सगळे करू शकलो.
• समजुती काही वेळा भ्रामक काही वेळा खऱ्या असतात. कोरोनामुळे काही गोष्टी काही दिवसांसाठी बंद कराव्या लागल्या. आता आपण हळुहळु काही गोष्टी सुरु करत आहोत.
• संपूर्ण जगाचे पॉझ चे बटन सध्या दाबलेले आहे अशी आजची स्थिती आहे.
• एकेकाळी लहान मुलांचा खेळ होता “स्टॅच्यू”… तस काहीसे कोरोना ने केले आहे पण हा काळ मागे वळून पहाण्याचा आहे. आपण काय केल, काय करायचे होते आणि काय केले पाहिजे… हे धोरण ठरवणे, दिशा ठरवणे यासाठी हा काळ महत्वाचा आहे.
• आपण सकारात्मक वातावरणाने सुरुवात केली. अगदी सुरुवातीलाच अनेक उद्योजकांना आपण सह्याद्री अतिथीगृहात भेटलो. देशातील दिग्गज मंडळी तिथे आली होती. देशातील प्रमुख चेहरे महाराष्ट्रासोबत असल्याचा हा खुप मोठा दिलासा होता.
• इतर राज्यातील मुख्यमंत्री इकडे महाराष्ट्रात येतात आणि आम्ही आमच्या राज्यात काय देतो हे सांगून त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्यास सांगतात. ते ऐकल्यावर काही जण तिकडे जातातही. पण अनेकजण इथेच आपल्या महाराष्ट्रात राहातात.
• मी आज आपल्या सर्वांना आपलेपणाची भावना देण्यासाठी इथे आलो आहे. ही माझी कर्मभूमी आहे… यातून राज्याचीच नाही तर देशाची सुबत्ता मी वाढवणार आहे हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.
• उद्योजक होणे म्हणजे स्वत: एकट्याची सुबत्ता मिळवणे नाही. तर इतरांनाही सोबत घेऊन त्यांच्या आयुष्यात सुबत्ता देणारे आपण आहोत असे सांगणारा वर्ग आहे.
या मधल्या काळात अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न आपण सुरु केला आहे. आपल्याला टप्प्याटप्प्याने सगळेच सुरु करायचे आहे.
• आपल्याला आपला मास्क सुद्धा उतरवून ठेवायचा आहे… पण त्यासाठी काही काळ थांबावं लागेल. आता आपण संयम ठेऊन शिस्तीने वागलो तरच आपल्याला कायमसाठी आपला मास्क उतरवता येणार आहे.
• सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना येथे बोलवा. त्यांना लोकांच्या रोजीरोटीसाठी काय करणार हे विचारा.
• सामान्य नागरिकांना रोजीरोटी मिळाली नाही तर देशात नाही तर जगात अस्वस्थता माजेल.
• हे होऊ नये म्हणून पुढच्या काळात उद्योग, उद्योजकांची महाराष्ट्राला खुप गरज.
• ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी होते की नाही हे पहाणे ही महत्वाचे आहे.
• उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे पण समतोल साधत आपल्याला पुढे जायचे आहे. या सुविधा देतांना राज्याचा समतोल बिघडता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, उद्योजक, सर्वसामान्य नागरिक आणि सगळ्या घटकांकडे मला मुख्यमंत्री म्हणून समान लक्ष द्यायचे आहे.
• अर्थचक्र सुरु राहण्यासाठी उद्योग सुरु राहणे महत्वाचे आहे. हे आपण का करतो तर दोन घास शांततेने खाण्यास मिळण्यासाठी. त्या शेतकऱ्यांना जपणे ही शासनाची जबाबदारी आहे.
• पर्यटनातून रोजगार वाढतो म्हणून आपण या क्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्राला सुंदर समुद्र किनारा लाभला, पुरातन मंदिरे महाराष्ट्रात आहेत, गडकिल्ले आहेत, जंगले आहेत. पण आपण अजूनपर्यंत पर्यटनाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नाही. या क्षेत्राकडे गांभीर्याने बघितलेलेच नाही.
• काळाप्रमाणे रोजगाराची अनेक क्षेत्र उदयाला येत आहेत त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
• मध्यंतरी केंद्र सरकारने रिव्हेंज टुरिझमचा धोका सांगितला होता व पर्यटनस्थळी होणारी गर्दी टाळायला सांगितले होते. आता अनेकजण विनाकारण इकडे तिकडे फिरत आहेत ही बाब वेगळी.
• विकासाबरोबर पर्यावरणाकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. आपल्यामुळे पर्यावरणाला धक्का लागणार नाही एवढी जरी आपण काळजी घेतली तरी खुप मोठी गोष्ट आहे असं मला वाटते.
• राज्याचा एक मॅप करू जो राज्यात कोणत्या भागात कोणत्या उद्योगांची सुरुवात करता येईल हे सांगेल आणि एकदा हे निश्चित झाले तर त्याला लागणाऱ्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकू.
• त्या त्या भागात सुरु होणाऱ्या उद्योगांची लोकांना माहिती देऊ. माहिती अभावी उद्योगांना विरोध होतो. ते टाळण्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन प्रादेशिक उद्योग उभारायचे, स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन तिथेच काम उपलब्ध करून द्यायचे याकडेही लक्ष देणे गरजचे आहे.
• कोविडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न होईल. या अस्वस्थेला तोंड देऊ शकलो नाही तर फार मोठे संकट निर्माण होईल.
• कुशल मनुष्यबळ निर्माण करून देण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. उद्योग मित्रासारखी संकल्पना आपण राबवत आहोत. हे उद्योग मित्र राज्यात गुंतवणूक कशी करायची याचे उत्तम मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. वन विंडो सिस्टीम आपण निर्माण केली आहे. राज्यात गुंतवणूकीसाठी “आपलेपणा”ची भावना निर्माण करण्याचे काम शासन करत आहे.
• माध्यम, प्रशासन आणि उद्योजक मिळून आज आपण एकत्र आलो आहोत ही खुप महत्वाची गोष्ट. ही जनता आपली, त्यांना दिलासा देण्याचे काम आपलं आहे.
• इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योजकांना त्यांच्या राज्यात गुंतवणूकीचे आवाहन करतात ही वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर येऊ नये असं मला वाटते कारण माझ्या महाराष्ट्रातील उद्योजकच महाराष्ट्राचे ब्रॅण्ड व्हावेत.
• महाराष्ट्र भारताचा आधार आहेच. महाराष्ट्रात संस्कार आहेत, जिद्द आहे, मेहनत आहे, निश्चय आहे.
• हा जीवन मरणाचा विषय, त्या विषयाला तुम्ही हात घातलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन
• मी तुम्हाला विश्वास देतो, वचन देतो की राज्यात उद्योजकांना जे सहकार्य आवश्यक आहे ते ती मी दिल्याशिवाय राहणार नाही. आपण हातात हात घालून पुढे जाऊ या आणि महाराष्ट्राचे नाव मोठे करूया.

Team Global News Marathi: