रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि १०-१५ फोटो काढून जातात – राम शिंदे

 

कर्जत | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांचा दणदणीत पराभव करून विजय मिळवला होता. मात्र निवडणुकीनंतर सुद्धा राम शिंदे यांनी रोहित पवारांवर टीका करण्याची संधी एकदाही सोडलेली नाही. त्यातच आता रोहित पवारांच्या फोटो-सेशन वरून शिंदे यांनी पवारांना टोला लगावला आहे.

रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि १०-१५ फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियावर पोस्ट करुन रोज कार्यक्रम घेत असल्याचं दाखवतात, असा गंभीर आरोप भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मी मतदारसंघातील कामांबद्दल अनेक प्रश्न विचारले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय?, असा सवाल राम शिंदे यांनी केला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी जास्त प्रमाणात आपल्या कर्जत तालुक्यातच करण्यात येत आहे. ती कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, यामध्ये काहीही आढळून येणार नाही. त्यावेळी जलसंधारणाची सर्व कामे जनतेच्या हितासाठीच झाली होती, असं राम शिंदेंनी सांगितलं.

Team Global News Marathi: