भानगडी लावणार्‍यांपासून सावध राहण्याचे गुलाबराव पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

जळगाव | राज्यातील प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करणार असून यासाठी माझा गाव – कोरोनामुक्त गाव हे अभियान राबविण्यात येणार असून शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले. तर शिवसैनिक तसेच पदाधिकार्‍यांनी पक्षाचा विचार शेवटचा घटकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. त्यांचे कार्य हे पक्षाला बळकटी प्रदान करणारे असावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिवसंपर्क अभियानाच्या कार्यान्वयनासाठी आयोजीत करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षात भानगडी लावणार्‍यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेण्याचा इशारा देखील दिला.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात १२ ते २४ जुलैच्या दरम्यान शिवसंपर्क अभियान आणि माझा गाव कोरोनामुक्त गाव हे दोन उपक्रम राबविण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात हे दोन्ही उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहेत. याच्या नियोजनासाठी आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत जळगाव शहर, जळगाव ग्रामीण व अमळनेर विधानसभा मतदारसंघात शिवसंपर्क अभियान तसेच माझा गाव कोरोनामुक्त गाव या मोहिमा राबविण्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शिवसेनेचा विचार शेवटचा घटकापर्यंत पोहचवण्यासाठी या मोहिमा उपयुक्त ठरणार आहेत. यात शिवसैनिकांची नोंदणी करावी. याच्या जोडीला आपल्या गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करणार्‍यांचा सत्कार देखील करण्यात यावा असे गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी काही जण पक्षात एकमेकांविषयी मने कलुषीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा भानगडी लावणार्‍यांपासून सर्वांनी सावध रहावे. मात्र कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर त्याला अंगावर घ्यावे असे स्पष्ट प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

Team Global News Marathi: