वसुली सरकार भरती काढत नाही आणि काढली तर सावळा गोंधळ घालतं

 

सांगली | आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर सरकारी भरतीच्या परीक्षेच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी ऐनवेळी आपली परीक्षा रद्द केली होती. त्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्राचा गोंधळ अजूनही संपलेला दिसत नाही. विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळाल्याने एकाच दिवशी दोन जिल्ह्यात परीक्षा द्यायला कसं जाणार? हा प्रश्न उपस्थित झाला होता.

गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला सरकारी भरतीच्या परीक्षांमध्ये गोंधळ घालण्याची सवय लागली आहे, असं म्हणत प्रशासन आणि सरकारमध्ये कोणताच ताळमेळ नसल्याची टीका केली आहे. दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा अधिकार नाकारत असल्याचा आरोप करत की वसुली सरकार नोकर भरती काढत नाही आणि काढली तर असा गोंधळ घालतं, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून महाविकास आघाडी सरकार यापूर्वी चांगलंच अडचणीत सापडलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा परीक्षेतील गोंधळ समोर आल्याने सरकारवर टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच यामधून सरकार आता नेमका कसा मार्ग काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Team Global News Marathi: