कोविड-19 दरम्यान नवजात शिशू आणि बालकांचा आहार कसा असावा-वाचा सविस्तर

 

कोविड-19 दरम्यान नवजात शिशू आणि बालकांचा आहार कसा असावा-वाचा सविस्तर

विशेषत: सांसर्गिक रोगांविरुध्द स्तनपान परिणामकारक

सर्वत्र पुन:श्च पसरत चाललेला करोना विषाणूचा प्रादूर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजना यासाठी शासनाने खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही जनतेला दैनंदिन स्वरुपात आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत.

करोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सर्व स्तरावर प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहे. यातील एक महत्वाचा घटक आहे.. स्तनदा माता आणि नवजात शिशू…या काळात यांची काळजी कशी घ्यायची, नवजात शिशू आणि बालकाचा आहार काय असावा, याविषयी सार्वजनिक आरोग्य विभागानेही काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत. *काय आहेत या सूचना जाणून घेवू या;पुढील लेखाद्वारे…*

जन्मापासून पहिल्या तासात बाळाला स्तनपानास सुरुवात करावी तसेच सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध द्यावे. स्तनपान केल्यामुळे नवजात शिशूचे इतर संभावित आजारापासून संरक्षण होते.स्तनपान हे नवजात शिशूंना त्यांच्या संपूर्ण शिशूवस्थेतील आजारापासून संरक्षण देते. स्तनपान विशेषत: सांसर्गिक रोगांविरुध्द परिणामकारक आहे.कारण स्तनपानामुळे बाळाला मातेकडून जीवनावश्यक प्रतिद्रव्य (अँटीबॉडीज) मिळतात व त्यांची रोगप्रतिकारक क्षमता बळकट होते.

संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती सतर्कता बाळगून स्तनपान सुरु ठेवा –
*स्तनपान करणाऱ्या मातेला ताप,खोकला अथवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर..*
• तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.
• खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक रुमालाने झाकावे.
• आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
• स्तनपान किंवा इतर कारणांसाठी बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर साबण आणि पाण्याने हात 40 सेंकदापर्यंत धुवावेत.

• बाळ जवळ असताना मास्कचा वापर करावा.
• मातेचा स्पर्श झालेली कोणतीही गोष्ट अथवा जागा ही नियमितपणे साबण आणि पाण्याने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने निर्जंतूक करावी.
जर माता आजारपणामुळे स्तनपान करु शकत नसेल तर एका स्वच्छ भांड्यात दूध काढावे. नंतर स्वच्छ कपात दूध घेऊन चमच्याने ते बाळाला पाजावे.

*दूध काढण्यापूर्वी-*
• साबण आणि पाण्याने हात 40 सेंकदांपर्यंत धुवावेत.
• दूधासाठीचा कप किंवा भांडे साबण आणि पाण्याने योग्य पध्दतीने धुवावेत.
*काढलेले दूध पाजताना-*
• मास्क घालावा.
• काढलेले दूध योग्य पध्दतीने स्वच्छ केलेल्या कप आणि चमच्याने पाजावे.

 

*जर माता अतिआजारपणामुळे स्तनपान करु शकत नसेल आणि दूध पिळून काढणे शक्य नसेल तर पुढील पर्यायांचा विचार करावा-:*
• स्तनपानाची पुन्हा सुरुवात (बंद केलेले स्तनपान काही काळाने पुन्हा सुरु करणे).
• दुसऱ्या मातेचे स्तनपान (दुसऱ्या मातेने स्तनपान करणे किंवा सुश्रूषा करणे).

जर कुणी अर्भक किंवा लहान बालक कोविड-19 चा संभाव्य बाधित असेल तर किंवा त्याला/तिला त्याचा संसर्ग झाला असेल तरीही मातेने स्तनपान चालू ठेवावे.
*बाळाची जलद गतीने वाढ आणि मेंदूचा विकास व्हावा यासाठी, सहा महिन्यानंतर त्यांची काळजी घेणाऱ्यांनी :-*
• स्तनपान चालू ठेवून पूरक आहाराची सुरुवात करावी.
• आहारातील विविधतेसाठी डाळ, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ,पिवळ्या , नारंगी आणि हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा.
• जर ताजी फळे उपलब्ध होत नसतील तर इतर आरोग्यदायी मार्ग शोधा, परंतु प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळा,कारण त्यात संतृप्त तेल, जास्तीची साखर,मिठाचा वापर केलेला असतो.
• गोड पेय टाळावे.
• स्वयंपाकापूर्वी, स्तनपानापूर्वी आणि जेवणापूर्वी साबण व पाण्याने हात धुवावेत.
• जेवण बनविण्याची जागा साबण व पाण्याने स्वच्छ धुवावी.
• बाळाला भरविण्यापूर्वी बाळाचे हात साबण व पाण्याने धुवावेत.
• बाळाला भरविण्यासाठी स्वतंत्र, वेगळ्या थाळीचा उपयोग करावा.
• बाळाला भरविण्यासाठी योग्य पध्दतीने स्वच्छ केलेली वाटी व चमचा यांचा वापर करावा.
• आजारी बालकास अधिकाधिक पोषक आहार आणि पेय द्यावे.
पूरक आहाराची उशिराने सुरुवात केल्याने बाळाच्या शारीरिक आणि मेंदूच्या विकासावर विपरीत परिणाम होतो आणि कुपोषणाची सुरुवात होण्याची जोखीम वाढते.

*माता किंवा बालक कोविड-19 संभाव्य बाधित अथवा संसर्ग झालेली व्यक्ती असेल किंवा नसेल तरीही आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांनी खालील बाबींची खात्री करावी-*
• लहान बालकांना आहार देण्याच्या मार्गदर्शक आहार-संहितेनुसारच आहार देण्यात यावा आणि स्वच्छतेच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी.
• स्तनपानाबाबत समुपदेशन, मूलभूत मानसिक आधार आणि गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांना प्रत्यक्ष लहान बालकांना आहार भरविण्यासाठी आधार द्यावा.
• बाळाच्या जन्मानंतर माता व नवजात बालक यांनी एकमेकांबरोबर राहिले पाहिजे, एकमेकांचा सहवास वाढविला पाहिजे.

• आईच्या दूधाला पर्यायी पेय, दूधाची बाटली, कृत्रिम स्तनाग्रे, चोखणी यास संस्था किंवा कर्मचाऱ्यांकडून प्रोत्साहन दिले जाऊ नये.

अशा प्रकारे कोविड-19 दरम्यान नवजात शिशू व बालक यांच्या आहाराबद्दल जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ, वर्ल्ड बँक,पिरामल फाऊंडेशन, अलाईव अँड थ्राईव आणि न्यूट्रिशन इंटरनॅशनल या सर्वांनी मिळून ही माहिती जगातील सर्व स्तनदा माता, नवजात शिशू व बालकांसाठी तयार केली आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) ईएमआरओ यांच्याकडूनही कोविड-19 च्या संसर्गादरम्यान स्तनपान चालू ठेवण्याचा सल्ला याबाबतचा संदर्भ घेण्यात आला आहे.

या लेखातील माहितीचा उपयोग स्तनदा मातांना निश्चित होईल आणि नवजात शिशू व बालके आईच्या पौष्टिक दूधापासून मुकणार नाहीत,असा विश्वास वाटतो…!

(मनोज शिवाजी सानप)
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग

ग्लोबल न्युज नेटवर्क: