पुन्हा लस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना टोला |

 

मुंबई | कोरोनाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम केंद्र तसेच राज्य सरकारने हाती घेतली आहे. मात्र लसीकरणाला सुरवात होऊन अनेक महिने उलटले तर अद्याप अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवताना दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार सरकारमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे.

त्यातच आता कोरोना लसीच्या नियमित पुरवठय़ाची हमी देण्याऐवजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यांतर्गत लसपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगत राज्यांवरच खापर फोडले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाच्या नियोजनाबाबत राज्यावर खापर फोडण्यापेक्षा लसपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी, असा टोला केंद्र सरकारला लगावला आहे.

टोपे म्हणाले की, राजकीय आरोप-प्रत्यारोपात आपल्याला रस नाही. राज्यांनी कसे नियोजन करावे हे सांगण्यापेक्षा हर्षवर्धन यांनी अखंडित लसपुरवठा कसा करणार ते सांगितले तर बरे होईल. लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने देशात अग्रेसर असून याची कल्पना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना नक्कीच आहे. लसीचे डोस फुकट जाण्याचे प्रमाणही राज्यात खूप कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला अखंडित लसपुरवठा करावा त्यासाठीचे शंभर टक्के नियोजन आम्ही केले आहे. राज्यातील कोरोना रुग्ण व लोकसंख्येची आकडेवारी केंद्राकडे असल्याने महाराष्ट्राला लसीचे किती डोस दिले पाहिजेत याची नेमकी आकडेवारीही केंद्राकडे नक्कीच असायला हवी, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

Team Global News Marathi: