रझाकार आणि ‘सजा’कार दोघांचा बंदोबस्त मनसे करेल; पत्र लिहीत राज ठाकरेंचा सूचक इशारा

 

आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आहे. या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आवाहन केलं आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं का बोललं जात नसेल? अर्थात रझाकारांचं लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं. त्यामुळं हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते आणि दुर्दैव असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे.

संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत तर आधुनिक ‘सजा’कार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगरच्या महापालिकेत खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा’कार. अर्थात लवकरच मनसे रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेल, असा इशारा देत राज ठाकरे यांनी मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Team Global News Marathi: