राऊत साहेब, उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा, भाजपा नेते धर्मपाल मेश्राम यांचा उर्जामंत्र्यांना टोला

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या खिशातून पैसा खर्च करून उच्च राहणीमान ठेवावे, त्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी लगावला आहे.

ऊर्जामंत्री राऊत यांनी अलीकडेच आपल्याला उच्च राहणीमान आवडत असल्याचे वक्तव्य केले होते.त्या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. मेश्राम यांनी म्हटले आहे की, राऊत यांना उच्च राहणीमान आवडत असेल तर त्याला कोणाची हरकत असणार नाही.

मात्र त्यासाठी त्यांनी स्वत:चा पैसा खर्च करावा, जनतेचा नाही. मंत्रिपद हे काही हौस-मौज पूर्ण करण्यासाठी दिलेले पद नाही तर ती एक जबाबदारी आहे. गरिब शेतकरी आणि सामान्य जनता काळोखात असताना ऊर्जामंत्र्यांना हा झगमगाट शोभतो का याचा तरी विचार करा असा सवालही श्री. मेश्राम यांनी या पत्रकातून उपस्थित केला आहे.

एकीकडे ऊर्जा कंपन्या आर्थिक संकटात असल्याचे कारण देत राज्यातील शेतकरी आणि सामान्य वीज ग्राहकांना वेठीस धरून सक्तीची वीज वसूली केली जात आहे. तर दुसरीकडे ऊर्जामंत्री जनतेच्या जीवावर उच्च राहणीमानात रहात आहेत. आपल्याला जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे, जनतेच्या पैशावर मौज करण्यासाठी नाही हे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ध्यानात घ्यावे. उच्च राहणीमान एवढं आवडत असेल तर त्यासाठी स्वत:चा पैसा खर्च करावा, जनतेचा नाही. वैयक्तिक कामासाठी विमानाने फिरल्यावर त्याची बिले देण्याची सुद्धा तयारी असावी. ती बिलं भरण्यासाठी सरकारी कंपन्यांना दबाव टाकू नये, असंही श्री.मेश्राम यांनी नमूद केले आहे

 

Team Global News Marathi: