राष्ट्रवादीला धक्का १० तालुकाध्यक्षांसह २ माजी नगरसेवक शिंदे गटात

 

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती झालेली असताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे. नवी मुंबईतील २ माजी नगरसेवकांसह १० तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडेंसह तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे.

एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. दरम्यान, अशातच अशोक गावडेंनी पक्ष सोडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला आता आणखी एक फटका बसला आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. त्यात ठाणे, मुंबई, नवी मुंबईत विशेष लक्ष देण्यात आले आहे.

मुंबईतही शिवसेनेचे अनेक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. तर नवी मुंबईत अशोक गावडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत पक्ष संघटना वाढवणं राष्ट्रवादीसमोर आव्हान बनलं आहे.

 

Team Global News Marathi: