राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणूकीसाठी सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत पुर्वाश्रमीचे भाजपचेनेते, माजी मंत्री आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल चढवला.
गेल्या 40 वर्षापासून मी भाजपमध्ये निष्ठेने काम केले, परंतु अनेकवेळा माझ्यावर अन्याय झाला. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मला राज्यपाल करण्यात येईल असे म्हटले होते. राज्यसभेसाठीही अंतिम क्षणी माझे नाव वगळून भागवत कराड यांचे नाव देण्यात आले. नंतरच्या विधानसभेलाही मला डावलण्यात आले. असे अनेक प्रसंग घडत गेल्याने मला नाईलाजाने भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे लागले, असे एकनाथ खडसे म्हणाले.
शरद पवार यांच्या नेतृत्वार मी विश्वास ठेवला आणि आज त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी करेन, असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. आमच्या भागामध्ये मी उभे आयुष्य भाजप वाढवण्यासाठी वाया घालवले. आता मी राष्ट्रवादीसाठी काम करेन. आमच्या भागातच नाही तर राज्यात ज्या-ज्या ठिकाणी शक्य असेन त्या ठिकाणी पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, प्रभुल्ल पटेल यांचे आभार मानले.