राष्ट्रवादीला मोठा धक्का, नाराज असल्याचे सांगत या आमदाराने फोन केला बंद

 

मुंबई | विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आमदार फुटू नये म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे. पण, मतदान सुरू झाल्यानंतरही राष्ट्रवादीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपण नाराज असल्याचे सांगून फोनच बंद केला आहे. तसंच राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदार अजूनही मुंबईत पोहोचले नाही. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सगळे आमदार मुंबईत हजर आहे.

पण, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील मुंबईत दाखल न झाल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. पण, खुद्द दिलीप मोहिते पाटील यांनी आपण नाराज असल्याचे सांगितलं आहे. मी अजूनही नाराज आहे. आम्ही सांगितलेली कामं बोलुनही होतं नाही, असं म्हणत खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजीला वाट मोकळी करून देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिलीप मोहिते पाटील हे अजूनही खेडमध्येच आहे, ते अद्यापही मुंबईत दाखल नाही. त्यांना मुंबईत मतदानाला दाखल होणार का असं विचारलं असता, त्यांनी फोन बंद केला आहे. आता दिलीप मोहिते पाटील हे नॉट रिचेबल झाले आहे. त्यामुळे दिलीप मोहिते पाटील मुंबईत दाखल होणार का प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

राज्यसभा निवडणुकीवेळी सुद्धा मोहिते पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली होती. आता विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावेळी दिलीप मोहिते पाटलांचे नाराजी नाट्य रंगणार असं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते अद्याप मुंबईत पोहोचलेले नाही. तर आशुतोष काळे हे सुद्धा मुंबईत अद्याप पोहोचले नसल्याचे वृत्त आहे.

Team Global News Marathi: